गुजरातमधील सूरत रेल्वे स्थानकावर शनिवार, ११ नोव्हेंबर रोजी चेंगराचेंगरीची घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे. या दुर्दैवी घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दिवाळीसाठी आपापल्या मूळ गावी परतणाऱ्या परराज्यातील लोकांची शनिवारी सुरत रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली होती.
दिवाळीनिमित्त परराज्यातील नागरिकांनी आपापल्या गावी जाण्याची वाट धरलेली असताना असेच लोक आपापल्या शहरात- राज्यात जाण्यासाठी सूरत रेल्वे स्थानकावर पोहचले होते. यामुळे शनिवारी लोकांची सूरत रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली होती. यावेळी रेल्वेत चढत असताना चेंगराचेंगरी झाली. या गडबडीत एकाचा मृत्यू झाला. तर, अनेक जण बेशुद्ध झाले आणि काही प्रवासी जखमी झाले आहेत.
चेंगराचेंगरीची घटना समोर येताच स्थानिक पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. जखमींना तत्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली असून काहींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, सूरतचे खासदार आणि गुजरातचे रेल्वे मंत्री दर्शना जरदोश यांनी रुग्णालयाला भेट देत जखमींची विचारपूस केली आहे. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे.
हे ही वाचा:
बुलढाण्यातील अपघातात भिक्षुकाचा मृत्यू, पिशवीत सापडले लाखो रुपये
ललित पाटीलची प्रकृती पुन्हा बिघडली
यवतमाळ जिल्ह्यात सीतामंदिराचा जीर्णोद्धार
श्रीलंका क्रिकेट मंडळाचे सदस्यत्व आयसीसीकडून रद्द
रेल्वे खात्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकोर म्हणाले, “सणासुदीच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम रेल्वेने या वर्षी मुंबई, गुजरात आणि मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये सुमारे ४०० फेऱ्यांसह ४६ विशेष गाड्या सोडल्या आहेत. सात लाखांहून अधिक प्रवासी याचा लाभ घेत आहेत. तसेच रेल्वेस्थानकावरील गर्दीच्या व्यवस्थापनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सूरत रेल्वे स्थानकावर जवळपास १६५ आरपीएफ आणि जीआरपीचे जवान तैनात करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त अतिरिक्त काउंटरही उघडण्यात आलं आहेत.”