पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरमधून चोख प्रत्युत्तर दिले. यानंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व हल्ले भारताने यशस्वीपणे हाणून पाडले. मात्र, या काळात पाकिस्तानच्या बाजूने अनेक खोट्या बातम्या आणि माहिती पसरवण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या तळांचे नुकसान झाल्याचे वृत्त अधिक पसरवण्यात आले. यानंतर दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः आदमपूर येथील हवाई दलाच्या तळाला भेट देऊन पाकिस्तानचा खोटारडेपणा जगासमोर उघड केला. दरम्यान, भारताकडून झालेल्या प्रत्युत्तर हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. याची कबुली पाकिस्ताननेही दिली आहे. अशातच आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान मोदींच्या पाऊलावर पाऊल ठेवून लष्करी छावणीला भेट दिल्याचे समोर आले आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणावानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला भेट दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ हे बुधवारी सियालकोटच्या पसरूर लष्करी छावणीत जाऊन संघर्षात सहभागी अधिकारी आणि सैनिकांना भेटले. सियालकोटमधील पसरूर कॅन्टोन्मेंट हे पंजाब प्रांताची राजधानी लाहोरपासून सुमारे १३० किमी अंतरावर आहे. पसरूर आणि सियालकोट विमान तळावरील रडार साइट्सना अचूक शस्त्रास्त्रांचा वापर करून भारताकडून लक्ष्य करण्यात आले होते, ज्यामुळे मोठे नुकसान झाले.
पाकिस्तान पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, सियालकोटमधील पसरूर छावणीला भेट देताना शरीफ यांनी चालू संघर्षादरम्यान ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या अधिकारी आणि सैनिकांची भेट घेतली. त्यांनी पसरूर छावणीतील अधिकारी आणि सैनिकांनाही संबोधित केले. येत्या काही दिवसांत, शरीफ पाकिस्तानी हवाई दल आणि पाकिस्तान नौदलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी हवाई तळ आणि नौदल तळांना भेट देतील, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.
सियालकोट येथे केलेल्या भाषणात शरीफ यांनी पाकिस्तानी सैन्याचे कौतुक केले. शत्रू आपल्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे पण तुम्ही त्यांना शांत केले आहे, असे ते म्हणाले. शरीफ यांनी त्यांच्या भाषणात भारतीय हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानाची चर्चा केली नाही. शरीफ म्हणाले की, येत्या काळात पाकिस्तानी सैन्याच्या शौर्यावर अनेक पुस्तके लिहिली जातील आणि संशोधन केले जाईल, असेही ते म्हणाले. तसेच शाहबाज शरीफ म्हणाले की, जर त्यांना कधी संधी मिळाली तर ते पाकिस्तानी सैन्याच्या शौर्यावर एक पुस्तक लिहितील.
हे ही वाचा:
पुलवामामध्ये जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा
मणिपूरच्या चांडेल जिल्ह्यात झालेल्या चकमकीत १० दहशतवादी ठार
तिथे बोरॉन आले, इथे बरनॉल येऊ दे…
छत्तीसगढच्या करेगुट्टात ३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान!
या भेटीत शरीफ यांच्यासोबत उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ, लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर, हवाई दल प्रमुख मार्शल झहीर अहमद बाबर सिद्धू, संघीय मंत्री अहसान इक्बाल आणि अत्ताउल्लाह तरार, कॉर्प्स कमांडर सियालकोट आणि वरिष्ठ नागरी आणि लष्करी नेतृत्व होते.







